सामान्य माणूस
सामान्य
माणूस हा असा अवलिया आहे की त्याची कुणी फारशी कदर करीत नाही, पण त्याच्याकडे
दुर्लक्ष करूनही चालत नाही. सामान्य माणसांची लक्षणे विविधांगी आहेत, तशीच भिन्न
टोकाचीदेखील आहेत. त्याचा आढावा तर विस्मयजनक वाटणारा असतो. सामान्य माणूस खूप
स्वार्थी असतो. प्रवासातल्या गर्दीत तर त्याचं हे सामान्यपण घडोघडी उघडकीस येते.
त्याचा बेरकीपणा तर लाजबाव! हाच सामान्य माणूस दंगेधोपे होतात, बॉम्बस्फोट होतात, दंगली होतात तेव्हा
पटकन् गरजूंच्या मदतीस धावून जातो. सामान्य माणूस खूप भोळसट असतो. कधी कधी त्याचा
हा भोळेपणा मूर्खपणा ठरतो हे त्याच्या गावीही नसते. अनाहूत सल्ला देण्यात सामान्य
माणसाचा हात कुणी पकडू शकणार नाही. तो न मागता इतरांना फुकटचा सल्ला देत असतो.
कधीकधी तो विषय त्यालाच धड माहीत नसतो. तरीदेखील आपली छाप पाडण्यासाठी तो बडबडतो
किंवा लोणकढी ठोकून देतो. सामान्य माणसाने दिलेल्या सल्ल्यांचे विश्लेषण केले तर
आपल्या लक्षात येते की, त्यात त्याचा काहीतरी हेतू दडलेला असतो. एकाच माणसाबद्दल
परिस्थितीनुसार दोन टोकाची मते सामान्य माणूस व्यक्त करतो. सचिन तेंडुलकरने शतक
ठोकले की तो त्याचा देव ठरतो. तो शून्यावर बाद झाला की हाच सामान्य माणूस शेरा
मारतो, ‘‘आता सचिनने निवृत्त व्हावे,
त्याचे वय झालंय्.’’ सामान्य माणूस ज्या
समस्येविषयी चटकन सहानुभूती व्यक्त करतो ती समस्या त्याने स्वतःच निर्माण केलेली
असते. सामान्य माणसाला जगातला कुठलाच विषय वर्ज्य नसतो. ग्रूपमध्ये एखादा विषय
निघाला की त्याची टकळी सुरू होते. सामान्य माणूस भावनाशील असतो व तो इतरांना ‘इमोशनल ब्लॅकमेल’ करून आपला फायदा
लाटण्यातही तरबेज असतो. तो प्रसंगी रडतो,
भेकतो,
जीव देण्याच्या धमकी देतो व आपले ईप्सित
साध्य करीत असतो. सामान्य माणसाची धार्मिकता ही मोठी मजेची बाब आहे. तो प्रार्थना
करतो. देवळात जातो. मग, ‘मी देवाधर्माचा माणूस’
असे स्वतःलाच सर्टिफिकेट देत असतो. तो
कटाक्षाने धर्म पाळतो, मानत नाही. त्याच्यावरील श्रद्धेचा प्रभाव हा त्याच्या
प्रार्थना नि पूजाअर्चा करण्याच्या वेळेपुरताच मर्यादित असतो. एरव्ही दैनंदिन
जीवनात तो देवाधर्माची ऐशी की तैशी करून ठेवतो. सामान्य माणूस तीर्थयात्रेला जातो
तेव्हा त्याची ती सुट्टीतली सहल असते. तो तीर्थयात्रा करून परत येतो तेव्हा
त्याच्यात काही फारसा फरक पडलेला नसतो. देवदर्शनाने तो थोडा दिवस भारावलेला वाटतो.
पुन्हा ये रे माझ्या मागल्या! काखेत कळसा नि गावभर वळसा, अशी त्याची बर्याचदा
स्थिती असते. हृदयातल्या परमेश्वराकडे तो ढुंकूनही बघत नाही व त्याचा शोध घेत
पायपीट करीत राहतो. सामान्य माणूस पूजाअर्चा,
प्रार्थना, नमाज करतो ते देवाकडे
काहीतरी मागण्यासाठी करतो. आपल्याला एवढं सारं मिळालंय त्याबद्दल देवाकडे कृतज्ञता
व्यक्त करण्यासाठी तो क्वचितच प्रार्थनेच्या वाटेला जातो. सामान्य माणूस
भ्रष्टाचार नको म्हणून आंदोलनात भाग घेतो नि स्वतः सहजगत्या भ्रष्टाचाराचा बळी
ठरतो. सामान्य माणसाला नेत्याची गरज लागते. त्यांच्या भावनेला हात घालणारा कुणी
भेटला की तो वेडापिसा होऊन त्यांच्या मागे लागतो. मग तो एखादा राजकीय पुढारी असो, सामाजिक कार्यकर्ता
असो किंवा एखादा ‘बाबा’, ‘बापू’ असो. सामान्य माणसाच्या खासियतीची ही केवळ एक झलक

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा