न्युटन
|
आयझॅक न्यूटन
न्यूटननं त्याचे गुरुत्वाकर्षणाचे
आणि गतीविषयक नियम खरंतर खूपच पूर्वी शोधून लिहून काढले होते, पण ते त्यानं प्रकाशित केले नाहीत. त्याला अशी गुप्तता राखायला खूप आवडे. `आपल्याला हे जग कसं चालतं ते कळलंय ना? मग उगीचच इतरांना कशाला सांगत बसायचं?' अशा काही आळसामुळे म्हणा किंवा आपण काही काळातच शोधलेलं शोधताना इतरांना कशी तपंच्या तपं घालवावी लागताहेत हे बघताना मिळणा-या विचित्र आनंदामुळे म्हणा तो आपले सगळे शोध असे वर्षानुवर्ष
लपवूनच ठेवायचा!
`शिवाय असं छापलं तर उगाचच ओळखीही वाढतात आणि वादही होतात, त्यापेक्षा न छापलेलंच बरं,' असं त्याला वाटे!
न्यूटनच्या प्रयोग करण्याच्या पद्धती खूपच विचित्र आणि अघोरी असायच्या. सूर्याकडे एकटक बघणं, सुईसारख्या गोष्टी डोळ्यात खुपसणं अशा तऱहेचे अघोरी प्रयोग त्यांचे परिणाम जाणून घेण्यासाठी न्यूटन करे आणि मग त्याला अनेक दिवस डोळे ठीक होण्यासाठी अंधा-या कोठडीत कडून बसावं लागे. एका (दंत) कथेप्रमाणे एका माणसानं न्यूटनला एक लोलक दाखवला व त्याची खूपच मोठी किंमत सांगितली. तेव्हा इतरांनी वेडय़ात काढूनही न्यूटननं तो लोलक विकत घेतला. घरच्या कामवालीनं तर तो लोलक काचेच्या वजनाप्रमाणेच
विकत घ्यायला पाहिजे होता असंही त्याला सुनावलं होतं. पण न्यूटनला आपण हे का करतोय हे पूर्ण चांगलं ठाऊक होतं! मग त्यानं प्रकाशावर संशोधन केलं आणि लोलकातून बाहेर पडणा-या वेगवेगळ्या रंगांविषयी लिहिलं, पण ते प्रकाशित मात्र केलं नाही. पूर्वीच्या विज्ञान जगतावर अॅरिस्टॉटलचा खूपच प्रभाव होता.
'प्रकाश हा एकजिनसी आहे' असं अॅरिस्टॉटल माने. न्यूटननं मात्र प्रकाशकिरण लोलकातून सोडला तेव्हा त्याला त्याचं अनेक रंगात विभाजन झालेलं आढळलं. याचा अर्थ प्रकाश एकजिनसी नव्हताच मुळी!
त्यानं प्रकाशावर बरंच संशोधन केलं. त्याचे ख्रिश्चन ह्यूगेन आणि रॉबर्ट हूक यांच्याबरोबर बरेच वाद याबाबत झाले. यामुळेच न्यूटननं त्याचे बरेचसे शोधनिबंध प्रकाशित न करण्याची प्रतिज्ञा घेतली होती! हूक आणि न्यूटन यांचे स्वभावही अगदी विरुद्ध टोकाचे होते. हूक एकदम बडबडय़ा तर न्यूटन एकदमच मितभाषी आणि गंभीर. हूकनंही विज्ञानातल्या ब-याच क्षेत्रात शोध लावले होते
(उदा, प्रिंग, सेल थिअरी...) पण तो बढायाही खूप मारत असे. काही कल्पना सुचली की हूक प्रथम छापून मोकळा होई. न्यूटन मात्र त्यावर वर्षोनुवर्ष विचार करे, आणि त्या गुप्त ठेवे. प्रकाशाबद्दल
न्यूटननं खूप लिखाणही केलं होतं. पण एकदा तो त्याच्या डायमंड या आवडत्या कुत्र्याला घरीच ठेऊन फिरायला गेला असताना डायमंडच्या धक्क्यानं ती मेणबत्ती पडली आणि मेणबत्तीच्या
ज्योतीनं त्याच्या लिखाणाच्या कागदांनी पेट घेतला आणि ते जळून गेले. त्यावेळी न्यूटन डायमंडला जवळ घेऊन ’अरे असं काय केलंस वेडय़ा?“ एवढंच प्रेमानं बोलला होता! असं म्हणतात की ते बघून न्यूटन असंही म्हणाला,
’मला सगळ्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात हे माहीत होतं. खरंतर त्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे किडे आकर्षित होतील, त्या किडय़ांकडे माझं मांजर आकर्षिलं जाईल आणि मांजराकडे माझं कुत्रं आकर्षित होऊन उडी मारताना ती मेणबत्ती पडेल आणि मग तिच्या ज्योतीमुळे ते कागद पेटतील, हे खरंतर मला कळायला हवं होतं!“ हे पुस्तक त्यानं खरंतर रॉबर्ट हूकला प्रत्युत्तर
देण्यासाठी लिहिलं होतं. पण ते जळल्यावर त्यानं ते बराच काळ परत लिहिलं नाही. ब-याच काळानंतर त्यानं जिद्दीनं पुन्हा लिहून काढलं. आणि जेव्हा ते परत 1704 साली लिहून पूर्ण केलं तेव्हा तेही त्यानं प्रकाशित फक्त हूक मरण पावल्यानंतरच केलं. उगाचच `हूकबरोबर वाद नकोत' म्हणून! न्यूटन जवळपास प्रत्येक लिखाणाचे अनेक ड्राफ्टस् करे. कित्येकवेळा तीच गोष्ट सुधारून
17-18 वेळा लिहून काढे!
या काळात न्यूटननं काहीही शोधून काढावं आणि हूकनं `ते मी अगोदरच शोधून काढलंय,` असं म्हणावं, असं खूपदा व्हायचं.
1683 साली एकदा एडमंड हॅली (धूमकेतू फेम), रॉबर्ट हूक आणि ख्रिस्तोफर रेन हे रात्रीचं जेवण घेत बसले असताना ग्रहांचं भ्रमण कसं असतं आणि त्याचं कारण यावर चर्चा सुरू झाली. रेननं हे कारण शोधणा-याला 40 शिलिंगचं बक्षीसही जाहीर केलं. हूकनं सवयीप्रमाणे
उत्तर माहीत असल्याचा दावा केला. हॅली मात्र त्याचं कारण शोधण्यात गर्क झाला. पण त्याला काही ते मिळेना. हॅलीला हूकचा नक्षा उतरवायचा होता. तेव्हा तो तडक न्यूटनकडे गेला. न्यूटननं हॅलीला या धडपडीमागचं कारण विचारलं. हॅलीनं असंतसंच उत्तर दिल्यावर न्यूटननं
`ते ग्रह लंबवर्तुळाकार फिरतात आणि मी हे गणितानं केव्हाच सिद्ध केलंय, पण त्याचे कागद मिळत नाहीयेत,' असं करून हॅलीला फुटवलं. खरं तर न्यूटनचे कागद हरवलेले नव्हते. त्याला आपली संशोधनं प्रकाशित करायला आवडत नसत. पण मग हूकची जिरवण्यासाठी
हॅली प्रयत्न करतोय हे जेव्हा कळलं तेव्हा मात्र केवळ हूकला धडा शिकवण्यासाठी न्यूटननं इतकी वर्ष लपवून ठेवलेलं ते संशोधन प्रकाशित करायचं ठरवलं. यातूनच मग जुलै 1687 साली न्यूटनचं प्रसिद्ध
`प्रिन्सिपिया' प्रसिद्ध झालं आणि विज्ञानाचा चेहरामोहराच
बदलून गेला!
लॅटिन भाषेत लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे विज्ञानाच्या इतिहासातलं जवळपास सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक होतं! त्याकाळी
`प्रिन्सिपिया' खूपच कमी लोकांना समजायचं. आणि गंमत म्हणजे आपलं संशोधन लपवून ठेवणा-या न्यूटनला ते जर प्रकाशित झालंच, तर ते निदान खूपच कमी लोकांना कळावं असं वाटे आणि म्हणून तर न्यूटननं ते पुस्तक प्रचंड बोजड आणि अवघड त-हेनं लिहिलं होतं म्हणे. एका उमरावानं तर त्यात काय लिहिलंय ते समजावून सांगितलं तर त्याला 500 पौंडांचं बक्षीसही ठेवलं होतं! त्यामुळे कुणी ते वाचायलाच तयार होईना. पण कळायला अवघड असलं तरी आपलं पुस्तक खपावं असं मात्र न्यूटनला वाटे! मग त्याचा `प्रचार' करण्यासाठी विद्यापीठातही न्यूटननं
`आपली माणसं' पेरून ठेवली होती. पण तरीही त्या पुस्तकासाठी मागणी एवढी कमी होती की त्या पुस्तकाचं इंग्रजीत भाषांतर न्यूटनच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी झालं! तथापि
`गृहिणींसाठी
न्यूटनचे सिद्धांत' अशासारख्या शीर्षकांची पुस्तकं मात्र लोकप्रिय व्हायला लागली. त्यांच्याविषयी
त्याकाळीच्या कॉफी हाऊसेसमधे गरमागरम चर्चाही होत असे. पण त्यानंतर त्यानं लिहिलेलं `ऑब्झर्वेशन्स ऑफ दी प्रोफेसीज' हे पुस्तक मात्र खूपच लोकप्रिय झालं. ते खूपच सोप्या भाषेत लिहिलं होतं. ‘प्रिन्सिपिया'वर
सगळ्यात चांगलं
400 पानी पुस्तक हे भारतीय नोबेल पारितोषक विजेते एस.
चंद्रशेखर यांनी लिहिलंय. 1995 साली ते प्रसिद्ध झालं.
त्याच्या ‘प्रिन्सिपिया'त
न्यूटननं गुरुत्वाकर्षणाविषयी
तर लिहिलंच होतं, पण गतीचेही तीन नियम मांडले होते. पहिल्या नियमाप्रमाणे-
`कुठलीही वस्तू जोपर्यंत बाहेरून कुठला जोर (फोर्स) कुणी लावत नाही तोपर्यंत आहे त्या स्थितीतच राहते किंवा सरळ रेषेत प्रवास करीत राहते. दुस-या नियमाप्रमाणे-
`कुठल्याही वस्तूतील प्रवेग
(ऍक्सिलरेशन) हा त्यावर लावलेल्या जोराच्या (फोर्सच्या) प्रमाणात बदलतो' आणि तिस-या नियमाप्रमाणे-
`क्रिया
(अॅक्शन) आणि प्रतिक्रिया (रिअॅक्शन) हे समानच असतात.' म्हणजे आपण भिंतीवर बोट दाबलं तर त्या बोटामुळे भिंतीवर जोर पडतो, तेवढाच जोर त्या बोटावर भिंतीमुळे पडतो!
`प्रिन्सिपिया'मुळे न्यूटनला प्रचंडच प्रसिद्धी मिळाली. तो रॉयल सोसायटीचा अध्यक्ष बनला.
`सर' हा किताब मिळालेला तो पहिलाच शास्त्रज्ञ! न्यूटन वागायला खूपच खडूस होता. कित्येक वेळा तो शत्रूचा `काटा' काढण्यात पुढेमागे बघत नसे. `प्रिन्सिपिया' या त्याच्या पुस्तकासाठी
`जॉन फ्लॅमस्टीड' या रॉयल सोसायटीच्या
खगोलशास्त्रज्ञानं न्यूटनला एकेकाळी खूप आकडेवारी आणि माहिती पुरवली होती. पण न्यूटनला पाहिजे असलेली माहिती आता मात्र फ्लॅमस्टीड त्याला द्यायला का-कू करायला लागला. न्यूटन लगेच भडकला. त्यानं आपलं रॉयल सोसायटीतलं पद आणि प्रभाव वापरून फ्लॅमस्टीडकडली
सगळी माहिती चक्क जप्त करवली, आणि फ्लॅमस्टीडचा वैरी
- एडमंड हॅली
- याला ती प्रकाशित करायला सांगितली. फ्लॅमस्टीड लगेच कोर्टाकडे धावला आणि त्यानं ते प्रकाशन थांबवण्याचा
कोर्टाचा वटहुकूम मिळवला. याशिवाय फ्लॅमस्टीडनं या प्रकाशित पुस्तकाच्या
सगळ्या प्रती विकत घेतल्या आणि त्या जाहीरपणे जाळल्या! न्यूटन मेल्याची सुखद स्वप्नंही मला पडतात, असं फ्लॅमस्टीड म्हणे. यामुळे पिसाटून
`प्रिन्सिपिया'तून फ्लॅमस्टीडचे
सगळे उल्लेख न्यूटननं गाळून टाकले!
जोनॅथन स्विफ्टनं `गालिव्हर्स टॅव्हेल्स'मधे न्यूटनच्या तत्त्वज्ञानावर
उपहासात्मक लिखाण केलं होतं. त्यातल्या कॅफ्टन लेम्यूएल गलिव्हरचं पात्र न्यूटनशी खूपच मिळतंजुळतं होतं असं ब-याचजणांना वाटे. जॉन लॉक आणि डेव्हिड ह्यूम या त्यावेळच्या तत्त्वज्ञांनी
न्यूटनविषयी खूपच गौरवात्मक उद्गार काढले होते. जॉर्ज बर्नाड शॉनंही त्याच्या
`इन गुड किंग, चार्लस् गोल्डन डेज' हे कमी प्रसिद्ध असलेलं नाटकही न्यूटनवरचं `सटायर'च होतं. 1939 साली त्याचा पहिला प्रयोग झाला. त्यात दोन लहान आकडय़ांचा गुणाकार करताना न्यूटन कसा अडखळतो, त्याचे लॉगॅरिदम बघायला जातो, आणि रस्त्यावरचा फेरीवाला ते कसं चटकन सांगतो असे गंमतीशीर किस्से आहेत! न्यूटन चक्क एक `सेलेब्रिटी शास्त्रज्ञ' बनला होता! त्याचे अनेक फोटो अनेक घरांत टांगलेले असत. अनेक कवितांत त्याचा उल्लेख होई. पण तरीही न्यूटन फारसा पार्ट्यांना जात नसे. क्वचित काही जणांना घरी जेवायला बोलावलं असेल तर तो चक्क ते विसरून जायचा आणि आपल्या खोलीत अभ्यासच करत बसायचा. मग पाहुण्यांची मोठी पंचाईतच व्हायची. ते वाट बघून मग परतायचे. एकदा तर स्वैपाकघरात
त्याच्या हातात अंडं आणि समोरच्या पाण्यात उकळत ठेवलेलं घडय़ाळ बघून काहीजण त्याच्या संपूर्ण धांदरटपणाविषयी
थक्क झाले होते!
यानंतरचं न्यूटनचं आयुष्य तसं श्रीमंतीत गेलं आणि लग्न न करूनही खूपच मनस्तापातही गेलं! असं म्हणतात की एकदा कधी नव्हे ते तो त्याच्या मैत्रिणीचा हात हातात घेऊन तिच्या डोळ्यात डोळे मिसळून बघत असताना त्याच्या डोक्यात बायनॉमिअल थिअरमचेच विचार चालले होते. तिचं बोट म्हणजे
`पाईप-क्लीनर' समजून त्यानं जेव्हा ते त्याच्या पाईपमधे वेंधळेपणानं घातलं तेव्हा ती किंचाळून निघून गेली. त्यानंतर
`आपण लग्न करण्यात काहीच अर्थ नाही' हे न्यूटननं अगदी शहाणपणानं ठरवलं! हूकबरोबरची भांडणं आणि `कॅल्क्यूलस कोणी प्रथम शोधून काढला' याविषयीचा लिबनिझबरोबरचा वाद हे सतत त्याला भंडावत होते. लिबनीझबरोबरचा हा वाद म्हणजे गणिताच्या दुनियेतलं एक प्रसिद्धच वैर किंवा युद्ध होतं. खरंतर न्यूटननं लिबनीझच्या अगोदर `कॅल्क्यूलस' शोधलं होतं हे खरंच होतं. पण त्यानं सवयीप्रमाणे
ते बरंच उशिरा - म्हणजे लिबनीझनंतर प्रकाशित केलं, त्याला लिबनीझ तरी काय करणार? या वादाच्या वेळी या दोघांमधे मोठे तटच निर्माण झाले होते. आणि सगळे त्यावेळचे वैज्ञानिक आणि गणितज्ज्ञ यांच्यात एक मोठी दुफळी निर्माण झाली होती. यावेळी दोन्ही बाजूंनी बरेच लेख छापून येत. नंतर लक्षात आलं की न्यूटनच्या बाजूनं आणि लिबनीझविरुद्ध
लिहिलेले लेख न्यूटनच्याच हस्ताक्षरात
(म्हणजे त्यानंच लिहिलेले) होते! त्याच्या मित्रांच्या नावानं त्यानं ते दडपून छापलेले होते! जसा वाद वाढला, तसा लिबनीझनं मग तो वाद रॉयल सोसायटीकडे `न्याया'साठी नेला. न्यूटन त्यावेळी रॉयल सोसायटीचा अध्यक्षच होता. त्यानं कपटानं चक्क आपल्या मित्रांचीच एक `चौकशी समिती' नेमली. त्यानंतर त्या समितीचा रिपोर्ट न्यूटननं स्वतःच लिहिला, आणि रॉयल सोसायटीला तो प्रकाशित करायला सांगितला. त्यात उलटा लिबनीझवरच चोरीचा आरोप केला होता. एवढय़ावरही भागलं नाही म्हणून त्यानं रॉयल सोसायटीच्या
नियतकालिकामधे त्या रिपोर्टचा `रिह्यू' छापला. न्यूटनमधे काही विकृतीही होत्या. लिबनीझ मरण पावल्यानंतरही `त्याच्यावर हल्ला चढवताना आपल्याला कशी मजा यायची' याविषयी न्यूटन भरभरून सांगे!
आयुष्याच्या
यानंतरच्या काळात तो धर्मशास्त्र
आणि `अल्केमी' यांच्याकडे जास्त वळला. तीसएक वर्ष तो एका मोठय़ा कढईत काहीतरी सतत उकळवत बसलेला असे. एवढा मोठा शास्त्रज्ञ असे विचित्रासारखे प्रयोग एवढा काळ का करत बसला होता हे मात्र अजून ब-याच जणांना न उलगडलेलं कोडंच आहे! न्यूटनच्या खाजगी पुस्तकसंग्रहात
138 पुस्तकं ही अल्केमीवर होती. त्यात लेखकांची खूपच गूढ आणि विचित्र भाषा आणि त्याहीपेक्षा
विचित्र आकृत्या होत्या. त्यावेळची मंडळी गुप्तता राखण्यासाठी
असल्या काहीतरी गोष्टी करत बसत. अजून अल्केमीतून केमिस्ट्री किंवा रसायनशास्त्र
जन्मायचं होतं. एकदा तर 1684 साली
`आज मी गुरू या ग्रहाला त्याच्या गरूडावरून उडायला लावलं' अशा त-हेचं गूढ काहीतरी न्यूटननं लिहून ठेवलं होतं. अशा अनेक वाक्यांचा खरा काय अर्थ होता हे लावण्यासाठी
अनेकजण अजून डोकं खाजवतायत! 1693 साली त्याला खूप मोठा `नर्व्हस ब्रेकडाऊन' झाला. याविषयीही बरीच मतं आहेत. काहींच्या मते तो प्रयोग करत असताना काही चित्रविचित्र रसायनं त्याच्या शरीरात गेल्यामुळे हे असं झालं असावं, तर काहींच्या मते त्याचा स्विस समलिंगी गणितज्ज्ञ पार्टनर हा त्याच्यापासून दूर गेल्यामुळे न्यूटनला वाटणा-या
`विरहा'मुळे हा ब्रेकडाउन झाला असावा! पण त्याला मधूनमधून वेडाचेही झटके यायचे असंही काहींचं म्हणणं आहे. त्यानं सॅम्यूएल पेपीसला एक मोठं विचित्रच पत्र लिहिलं होतं.
`गेल्या बारा महिन्यात मी व्यवस्थित जेवलेलोही नाहीये. माझी मनःस्थितीही मुळीच ठीक नाहीये. त्यामुळे मी आता तुम्हाला किंवा दुस-या कुणाही मित्राला भेटू इच्छित नाही,' असं त्यात म्हटलं होतं. गंमत म्हणजे हे पत्र लिहिल्यानंतर
एका वर्षातच पुन्हा न्यूटन आणि पेपीज `लॉटरीचं गणित' यावर चर्चा करायला लागले होते!
केंब्रिजला कंटाळून त्यानं लंडनला टाकसाळीत काम केलं. पण मग तिथे काम नीट करता यावं म्हणून त्यानं अर्थशास्त्र, व्यापार, फायनान्स याविषयीचीही
पुस्तकं आणून वाचली. तिथे खोटय़ा नाण्यांमुळे
होणा-या भ्रष्टाचारावर उपाय शोधून खूप पैसा आणि नावही कमावलं. खोटी नाणी कोण तयार करतोय हे समजण्यासाठी त्यानं चक्क एक गुप्तहेराचं जाळं पसरून ठेवलं होतं! त्यातल्या छोटय़ामोठय़ा गुन्हेगारांनाही
तो फाशी देण्यास पुढेमागे बघत नसे. 1701 साली त्याला जो `सर' हा किताब देण्यात आला तो त्याच्या शोधांमुळे नव्हता, तर राजकारणामुळे
होता! न्यूटन दोनदा खासदारही झाला. पण
1705 साली त्यानं राजकारणाचा त्याग केला. तो खासदार असताना एकदाही एकही वाक्य पार्लमेंटमधे
बोलला नाही. फक्त एकदा तो बोलायला उभा राहिला तेव्हा सगळेजण त्याला ऐकायला एकदम शांत झाले. पण फक्त थंडी खूप वाजल्यानं खिडक्या बंद ठेवण्याची विनंती करून न्यूटन खाली बसला! 1704 साली त्याचं `ऑप्टिक्स' हे पुस्तक प्रकाशित झालं. ते त्यानं नऊ वर्षांपूर्वीच खरं तर लिहून ठेवलं होतं!
या सुमाराला एक गंमतशीर गोष्ट घडली. न्यूटननं टाकसाळीत काम करायला सुरुवात केल्यावर `त्याचा आता गणित आणि विज्ञान यांच्याशी संबंध राहिलेला नाही त्यामुळे न्यूटन आता संपलाय' अशीच सगळ्यांची समजूत झाली होती. जॉन बर्नोली नावाचा एक गणितज्ज्ञ होऊन गेला. (बर्नोली थिएरम मांडणारा बर्नोली वेगळा होता!) या बर्नोलीनं गंमत म्हणून एक गणितातलं अवघड कोडं जगातल्या सगळ्या गणितज्ज्ञांना टाकलं. आणि ते सोडवायला त्यानं जास्तीत जास्तीत सहा महिने दिले होते. `एक पदार्थ कमीत कमी वेळात पडण्यासाठी कुठल्या वक्र मार्गानं ठराविक परिस्थितीत प्रवास करेल?' असा तो प्रश्न होता. सगळ्यांची जिरवायची आणि आपण मजा बघत रहायचं अशी बर्नोलीची योजना होती. न्यूटननं ते वाचताच 24 तासांच्या आत ते सोडवून बर्नोलीला परत पाठवलं. ते वाचता क्षणी त्यातली प्रचंड बुद्धीची झेप आणि सोडवण्याची पद्धत बघून ते कोणी सोडवलंय हे बर्नोलीच्या लगेच लक्षात आलं. त्यावेळी बर्नोली उद्गारला होता,
’हे सोडवलंच तर कोण सोडवेल ते मला माहीत होतं. हे तर मला वाघाचे पंजे दिसताहेत!“ यावरून खरा वाघ कोण आहे हे त्यानं चटकन् ओळखलं होतं! असंच
1716 साली न्यूटन 75 वर्षाचाअसताना लिबनीझनं न्यूटनची परीक्षा बघण्यासाठी गणितातला एक प्रचंड अवघड प्रश्न न्यूटनकडे चॅलेंज म्हणून पाठवून दिला. त्याला तो सोडवता न आल्यानं आपल्याला मजा बघता येईल असं त्याला वाटलं. पण न्यूटननं तो फक्त काही तासात सोडवून परत पाठवला तेव्हा लिबनीझ चाट पडला होता! 20 मार्च
1727 रोजी 83 व्या वर्षी `ब्लॅडर स्टोन'मुळे न्यूटन मरण पावल्यानंतर त्याला वेस्टमिन्स्टर ऍबेमध्ये पुरण्यात आलं. काहींच्या मते त्यानं केलेल्या अनेक रासायनिक प्रयोगांमुळे
झालेल्या विषबाधेनं न्यूटन मरण पावला. न्यूटननं
30000 पौंड म्हणजे त्या काळच्या मानानं खूपच मालमत्ता जमवली होती. त्याच्यानंतर
त्याच्या मालमत्तेचा मोठा हिस्सा एका उडाणटप्पू माणसाकडेच गेला. त्यानं तो घोडय़ांची रेस, दारू, सट्टा आणि इतर अनेक मार्गांनी घालवला.
न्यूटनच्या शोधांनंतर `आता सगळे ग्रह-तारेच काय, पण पृथ्वीवरच्या
वस्तू, त्यांच्या हालचाली, वेग, प्रवेग आणि इतर सगळ्या गोष्टींचे नियम सापडले आहेत; त्यामुळे सगळय़ा विश्वाचंच कोडं आता आपल्याला समजलंय; आता काय शोधायचं राहिलंय' असंही कित्येकांना वाटायला लागलं. न्यूटनच्या नियमांप्रमाणे जर कुठल्याही क्षणी या विश्वातल्या
सगळ्या वस्तूंचा ठावठिकाणा (पोझिशन), वस्तुमान
(मास), वेग
(व्हेलॉसिटी) आणि प्रवेग (ऍक्सिलरेशन) हे आपल्याला माहीत असतील तर पुढच्या कुठल्याही क्षणाला या विश्वातील सर्व गोष्टींचा ठावठिकाणा, वस्तुमान, वेग आणि प्रवेग हे काय असतील हे आता ठरवता येईल. म्हणजे ठराविक दगड, खुर्ची आणि विश्वातले सगळे पदार्थ, वस्तू हे ठराविक काळानंतर
(उदा. 100 वषनंतर,
200 वषनंतर, किंवा केव्हाही) कुठे असतील याचं भाकित आपल्याला करता येईल! एवढंच काय मनातले विचारही मेंदूतल्या किंवा शरीरातल्या कुठल्याशा कणांच्या किंवा द्रवांच्या हालचालींमुळे
बदलत असतील, तर मग त्यांच्याविषयीही
भाकित करता येईल आणि त्यामुळे कुठल्या वेळी कोणाच्या मनात काय विचार येतील. इतरही सगळ्या गोष्टींची भाकितं करता येतील. थोडक्यात
`हे जग पूर्वनियोजित नियमांप्रमाणेच
चाललंय आणि चालत राहील. आपण त्यात काहीच बदल करू शकत नाही.' असा निष्कर्ष बरेच तत्त्वज्ञ न्यूटनच्या नियमांवरून काढायला लागले. हा एका त-हेचा
`डिटरमिनिस्टिक' विचारच होता. याचा तत्त्वज्ञानावर
आणि नैतिकतेवर खूप खोलवर परिणाम होणार होता. हे सगळं जग हे पूर्वनियोजित नियमांप्रमाणे चालत असेल, तर 'एखाद्यानं
एखादी गोष्ट चूक केली' असंही म्हणता येणारच नाही. कारण `त्याशिवाय
दुसरं काही करणं त्याच्या हातातच नव्हतं मुळी! मग या अनैच्छिक कृत्त्याबद्दल त्याला शिक्षा कशी देणार?'
असा काहीतरी वेगळाच विचार लोक करू लागले.
न्यूटनच्या आयुष्यात
स्त्रिया
फारशा आल्याच नाहीत. कदाचित आईबद्दलचा द्वेष आणि लहानपणीचे अनुभव त्याला कारणीभूत असावेत. कॅथेरिन बारीन नावाची एक मुलगी मात्र कदाचित त्याला आवडली असावी असं म्हणतात. ती 1690 च्या दशकात न्यूटनबरोबर रहायलाही गेली होती. पण तिथेच तिची (न्यूटनच्या संमतीनं)
अनेकांबरोबर प्रेमप्रकरणंही झाली!
न्यूटनच्या ताकदीचा शास्त्रज्ञ पुढची अनेक शतकं झाला नाही. न्यूटनच्या बुद्धिमत्तेचा
दरारा पुढची अनेक दशकं, शतकं टिकला. खरंतर तो अजूनही चालूच आहे. न्यूटननंतर कोणीही काहीही शोध लावला तरी
`अरे हे न्यूटनला कसं सुचलं नाही? आपलं बरोबर तर आहे ना?' असंच मोठमोठय़ा शास्त्रज्ञांनाही
बरीच शतकं वाटत राहीलं. स्वतः न्यूटन स्वतःविषयी बोलताना म्हणाला होता, ’माझ्याकडे लोक कसे बघतील ते मला माहीत नाही. पण मला मात्र मी समुद्रकिना-यावर खेळणा-या एका मुलाप्रमाणेच
वाटतो. इतर अनेक गारगोटय़ांपेक्षा
जरा गुळगुळीत, वेगळी मला सापडली एवढंच. पण निसर्गाचा प्रचंड समुद्र एक गूढ म्हणून माझ्यासमोर उभा आहे त्याचं काय?“ आईनस्टाईनही
न्यूटनला सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणायचा ते काही उगीचच नव्हे. न्यूटननंतर `आता विज्ञानात काय शोधायचं शिल्लक आहे?' असा प्रश्न लोकांना पडायला लागला. पण तेवढय़ात 'क्लासिकल फिजिक्स' ची धुरा सांभाळणारा आणखी एक प्रचंड ताकदवान शास्त्रज्ञ एका शतकानंतर अजून या क्षितिजावर चमकायचा होता. त्याचं नाव होतं जेम्स क्लार्क मॅक्स्वेल!
|

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा