·
सुप्रसिद्ध लेणी व शिल्पे
·
नाशिक येथे असणार्या
पांडवलेण्यात ‘लेण’ हा शब्द प्रथम आलेला आहे.
त्यापासूनच लेणी हा शब्द रूढ झाला. लेणी म्हणजे डोंगरातील दगडांवर केलेले कोरीव
काम होय. लेणी निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा एकसंघ व कणखर स्वरूपाचा दगड
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. याशिवाय प्राचीन काळापासून
महाराष्ट्राने धार्मिक सहिष्णुतेचेच धोरण स्वीकारलेले दिसते. त्याचा परिणाम
म्हणूनदेखील बौध्द, जैन, हिंदू या
धर्मांच्या-पंथांच्या विविध लेणी एकत्र किंवा वेगवेगळ्या स्वरूपात बघायला मिळतात.
केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध असणार्या अजिंठा-वेरूळ येथील लेणी या
महाराष्ट्रात आहेत. या लेण्या म्हणजे महाराष्ट्राचे वैभवच आहेत. इ.स.पू. दुसरे शतक
ते इ.स. आठवे शतक या काळात औरंगाबादमधील अजिंठा आणि वेरुळ येथे या लेणी निर्माण
करण्यात आल्या.
·
सह्याद्री पर्वताजवळ
वसलेल्या अजिंठा गावाच्या वायव्येस एका डोंगरात अजिंठा लेणी कोरलेली आहे. या
डोंगररांगेतील बेसॉल्ट जातीचा एकसंघ दगड या लेणी निर्माण करण्यासाठी खूप उपयोगी
ठरला आहे. एकूण ३० गुहांचा समावेश असणार्या या लेणीत हीनयान व महायान अशा दोन
बौध्दधर्मीय लेणींचा समावेश होतो. हीनयान पंथीय लेणींची निर्मिती इ.स.पू. दुसरे
शतक ते इ.स. पहिले शतक या काळात झालेली आहे. त्यात लेणी क्रमांक ८,९,१०,१२,१३,१५ यांचा
समावेश होतो. महायान पंथीय लेणींची निर्मिती इ.स. ४ थे शतक ते इ.स. ८ वे शतक या
काळातील असल्याची शक्यता आहे. इ.स. ६०२ ते इ. स. ६६४ या काळात युऑन श्वॉंग हा चिनी
प्रवासी बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी भारतात आला होता. त्याने अजिंठ्याच्या
लेणीला भेट दिल्याचा उल्लेख इतिहासात सापडत नसला, तरी त्याने
या लेणींविषयी जे लिहून ठेवले आहे, त्यावरून या लेणींच्या
तत्कालीन वैभवाची आपल्याला कल्पना करता येऊ शकते. तो असे लिहितो की, ‘या लेणींमधील
गौतम बुद्धाची मूर्ती २० मीटर उंचीची असून, त्यावर एकावर
एक या प्रमाणे दगडाची सात छत्रे आहेत. या छत्रांना कसलाच आधार नाही. डोंगराच्या
दरडींमध्ये कोरलेली या लेणींची दालने आपल्या पाठीवर हे डोंगर तोलून धरत आहेत,
असा पाहणार्याला भास होतो.’ मध्ययुगात या लेणींकडे
कोणाचे फारसे लक्ष गेलेच नाही. १८१९ च्या एप्रिल महिन्यात स्मिथ नावाच्या एका
ब्रिटिशाने या लेण्यांचा शोध लावला. काळाच्या ओघात या लेणींचा काही व्यक्तींनी,
विविध राजवटींतील सत्ताधीशंनी-मुद्दाम, या लेण्यांचे
महत्त्व न समजल्यामुळे - विध्वंस केला. मात्र तरीही आज या लेणींचे जे काही अवशेष
बाकी आहेत, त्यावर या लेण्या जगप्रसिद्ध झाल्या आहेत.
इतकेच नाही तर त्यांचा समावेश ‘जागतिक वारसा’ -
World Heritage या स्थळांच्या यादीमध्ये देखील झाला आहे.
·
·
अजिंठा - वैशिष्ट्यपूर्ण
लेणी :
o
अजिंठ्याच्या एकूण ३०
लेणींपैकी काही लेणी खूपच अप्रतिम आहेत. त्या लेणींची माहिती पुढीलप्रमाणे-
o
क्रमांक १ च्या लेणीमध्ये
गौतम बुद्धाची मूर्ती आहे. या लेणीच्या तुळईवर बुद्धजीवनातील प्रसंग, हत्तीच्या
झुंजी, शिकार असे विविध विषय कोरले आहेत. या लेणीमधील
अर्धस्तंभाच्या अगदी वर आकाशातून उडणारे गंधर्व दाखवले आहेत. हे गंधर्व पाहतांना
त्यांनी जणू वरचे छत तोलून धरले आहे असा भास होतो. ही लेणी मुख्यत: आतील
चित्रकामासाठी प्रसिद्ध आहे. या लेणीच्या मुख्य गर्भगृहात बुद्धाची एक भव्य अशी
मूर्ती आहे. ही मूर्ती शांत व ध्यानमग्न दिसते. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या
मूर्तीच्या चेहर्यावर समोरून उजेड टाकला, तर चेहरा ध्यानमग्न
दिसतो. उजव्या बाजूने प्रकाश टाकला, तर ही मूर्ती स्मितहास्य
करीत असल्याचा भास होतो. डाव्या बाजूने प्रकाश टाकला, तर
मूर्तीच्या चेहर्यावर खिन्न, उदास भाव दिसतात. या
लेणींमधील रंगकामाचे सुशोभीकरण आणि बोधप्रद कथा अशा दोन विभागात विभाजन करता येईल.
सुशोभीकरणाच्या विभागात छत, स्तंभ, त्यावर
असणारे हत्ती, वाघ, मोर, हंस, बदके,
तसेच कलाकुसर यासाठी रंगकाम केलेले आहे.
o
उपदेशपर कथांच्या विभागात
बौद्ध वाङ्मयातील कथांचे रेखाटन असले, तरी काही हिंदू पुराणातील
कथांची रेखाटनेदेखील यात दिसतात. अलंकार व हाता-पायाच्या बोटांचे सूक्ष्म रेखाटन
हे येथील शिल्पकलेचे वैशिष्ट्य होय. अत्यंत नाजूकपणे व सजीव वाटतील अशा पद्धतीने
या शिल्पातील हाता-पायांच्या बोटांचे रेखाटन केलेले आहे. जातककथांमधील शंखपाल या
जातकाची कथादेखील येथे पाहायला मिळते. त्यात नागराज शंखपाल मगधच्या संन्यासी
राजासमोर बसून प्रवचन ऐकत असल्याचे दृश्य आहे. या दृश्यातच गुडघे मोडून एका हातावर
आपल्या पूर्ण शरीराचा भार देऊन पाठमोरी बसलेल्या एका स्त्रीचे चित्र आहे. हे चित्र
म्हणजे ‘मॉडेलिंगचा’ एक उत्कृष्ट नमुना आहे.
याच लेणीमध्ये एका भिंतीवर ‘श्रावस्तीचे विश्र्वरूप’
या नावाने प्रसिद्ध असलेले चित्र आहे. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने
अर्जुनाला आपले विश्वरूप दाखवले होते, त्याप्रमाणे गौतम
बुद्धानेदेखील काही विद्वान पंडितांना आपले विश्र्वरूप दाखवले. या चित्रात जे अनेक
बुद्ध प्रगट झाले आहेत, त्या प्रत्येकाच्या वेशभूषा, रंग यांत फरक
दाखवला आहे.
·
लेणी क्र.१ आणि २ यांच्या
वास्तू आराखड्यात काहीच फरक नाही. मात्र दोहोंच्या शिल्पकृती, त्यांची शैली
यात फरक आहे. या लेणीतील खांब उत्तमरीत्या सुशोभित केलेले आहेत. गाभार्यात असणार्या
बुद्धमूर्तीच्या बाजूस हारिती आणि पाश्चिक या बौद्ध साहित्यातील पात्रांची चित्रे
आहेत. या लेणीतील छतावरील चित्रे आजही चांगल्या स्थितीत आहेत. छत हे कमळाच्या
चित्राने सजवलेले आहे. या लेणीत बुद्धजन्म व बौद्ध साहित्यातील इतर काही कथाप्रसंग
रेखाटले आहेत.
·
लेणी क्र. ३ ते ५
चित्रशैलीच्या दृष्टीने विशेष महत्त्वाच्या नसल्या, तरी तेथील
शिल्पकला बघण्यासारखी आहे. सहाव्या क्रमांकाच्या लेणीमध्ये ‘श्रावस्तीचे
विश्वरूप’ पुन्हा एकदा चित्रित केले आहे. गर्भगृहातदेखील बुद्धाची एक
मूर्ती असून त्या मूर्तीच्या आजूबाजूस अनेक बुद्धमूर्ती रंगवल्या आहेत. सातवी
गुहादेखील अशाच प्रकारची आहे. आठव्या गुहेची अवस्था आज अत्यंत वाईट आहे. नवव्या
क्रमांकाची गुहा ही हीनयान पंथाची आहे. गुहेतील शिल्पे व चित्रे पाहून ती महायान
पंथीयांनी वापरली असे दिसते. अजानबाहू बुद्धाच्या अनेक मूर्ती या गुहेत कोरलेल्या
आहेत. ‘षडदंत’ नावाची जातककथा दहाव्या
क्रमांकाच्या लेणीमध्ये कोरलेली आहे. त्यात दिसणारे हत्तींचे कळप आणि बेशुद्ध
पडलेली राणी चुलसुभद्रा- ही दोन दृश्ये रसिकांच्या भावनेला हात घालणारी आहेत.
सतराव्या क्रमांकाच्या लेणीत गौतम बुद्ध आणि त्यांचा मुलगा राहूल यांच्या भेटीचे
चित्र आहे. त्यात राहूल आपल्या पित्याकडून आशीर्वादरूपी भिक्षेची मागणी करत आहे
असे दृश्य चित्रित केले आहे. या चित्रातील पात्रांच्या चेहर्यावर ज्या भावभावना
दाखवल्या आहेत, त्यामुळे हे शिल्प खूप प्रसिद्ध झाले आहे.
याशिवाय या लेणीतच एके ठिकाणी आरशात पाहून शृंगार करणार्या तरुणीचे चित्र कोरलेले
आहे. या चित्रातील पात्राच्या चेहर्यावरील भाव विलक्षण आकर्षक आहेत, आणि त्या
पात्राच्या गळ्यातील मोत्याच्या हारावर प्रकाश टाकला, तर तो हार
खराच आहे असे पाहणार्याला वाटते. १९ व्या क्रमांकाची महायान पंथीय लेणी म्हणजे
चैत्यगृहाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. २६ व्या लेणीमध्ये गौतम बुद्धाची शयन करत
असलेली मूर्ती जवळपास सात मीटर लांबीची आहे. या मूर्तीच्या चेहर्यावर दिसणार्या
शांत भावनादर्शनामुळे ही मूर्ती पर्यटकांना, अभ्यासकांना
एक वेगळेच आध्यात्मिक, आत्मिक समाधान देऊन जाते.
·
या जगप्रसिद्ध अजिंठा
लेणींचा अध्यात्म हा विषय असल्याचे एकदा मान्य केले की या लेणींमधून जाणवणारे दया,
क्षमा, शांती हे गुण अधिकच भव्य-दिव्य भासतात. या
लेणींमधील चित्रे काढण्यासाठी भिंतीवर प्रथम माती, शेण, तुस, भाताचा
भुस्सा किंवा ताग यांच्या वस्त्रगाळ करून काढलेल्या मिश्रणाचा लेप चढवला गेला
होता. त्यानंतर त्यावर चुना किंवा संदल यांचा चकचकीत पातळ थर चढवला गेला, आणि नंतर
त्यावर गेरूने चित्रे काढून त्यात रंग भरले. यावरून तत्कालीन रसायनशास्त्र,
चित्रकला, वास्तुकला यांचे ज्ञान किती प्रगत होते याची
कल्पना करता येते. या लेणींमधील चित्रांसाठी पांढरा, काळा,
पिवळा, हिरवा, तांबडा, निळा हे रंग
वापरलेले आहेत. सध्या या लेणींचे वायू प्रदूषण व इतर गोष्टीपासून संरक्षण व्हावे
म्हणून या लेणींच्या परिसरात केवळ नैसर्गिक वायुवर चालणार्या गाड्यांना प्रवेश
दिला जातो. तसेच, जपानच्या सहकार्यानेदेखील या लेणींच्या
सुरक्षिततेचे उपाय केले जात आहेत.
·
वेरूळ :
o
अजिंठा येथील लेणी ज्या
चित्रकला व शिल्पकला यांमुळे जगप्रसिद्ध आहेत त्याच कारणांमुळे वेरूळ येथील
लेणीदेखील प्रसिद्ध असून, त्यास मोठ्या प्रमाणावर
प्रसिद्धी मिळाली ती येथील ‘आधी कळस मग पाया’ ही नवी म्हण
निर्माण करणार्या ‘कैलास मंदिरामुळे’. औरंगाबादपासून
वायव्येस सुमारे २१ कि.मी. अंतरावर बालाघाटाच्या डोंगरात वेरूळच्या लेणी वसलेल्या
आहेत. पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या कैलास लेण्यांचा जिर्णोद्धार करून
तेथील पूजाअर्चेसाठी वर्षासन बांधून दिले. महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर
स्वामी यांचेदेखील काही काळ येथील लेणींमध्ये वास्तव्य होते असे उल्लेख इतिहासात
आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबादेखील वेरूळचे वतनदार-पाटील होते. ‘एलापूर’
असे नाव असलेल्या गावाचे काळाच्या ओघात अपभ्रंशित रूप म्हणजे वेरूळ होय,
असा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे. या लेणींमधील १७ लेणी हिंदुधर्मीय आहेत. १२
लेणी या बौद्ध धर्मातील महायान पंथाच्या असून पाच लेणी जैनधर्मीय आहेत.
o
वाकाटकांच्या राजवटीचा
शेवट झाल्यावर चालुक्य आणि कलचुरी या राजवटींच्या संघर्षमय काळात या लेणींची
निर्मिती झाली, असे काही तज्ज्ञ मानतात. या लेणींमधील कला,
वास्तुरचना पाहून दोन कालखंडांत या लेणींच्या निर्मितीचा काळ विभागता येतो.
पहिल्या कालखंडातील लेणी या चैत्य किंवा बौद्ध मंदिर यांच्या आकाराप्रमाणे तयार
केलेल्या असून हा कालखंड इ. स. ५०० च्या आसपास सुरू झाला आहे. त्यातील सर्वात आधी
रामेश्वर तर सर्वात शेवटी दशावतार हे लेणे तयार करण्यात आले. दशावतार या लेणींच्या
निर्मितीचा काळ साधारणत: सातव्या शतकाचा उत्तरार्ध मानला जातो. १७ व १८
क्रमांकाच्या लेण्यांच्या निर्मितीपासून दुसरा कालखंड सुरू झाल्याचे मानले जाते.
या कालखंडातील ‘धुमार लेणे’ हे सर्वात
शेवटचे लेणे होय. नवव्या शतकाच्या आरंभी जैन लेणी (क्र. ३० ते ३४) निर्माण झाल्या.
या लेणींमधील दहाव्या क्रमांकाची लेणी बौद्धधर्मीय महायान पंथीय असून ती
वास्तुरचनेच्या दृष्टीने उत्तम आहे. या लेणीत प्राचीन काष्ठशिल्पे दिसत असल्यामुळे
या ‘विश्वकर्मा’ नामक लेणीला ‘सुतार लेणे’
असेही म्हणतात. सिंहासनावर विराजमान झालेली बुद्धमूर्ती येथे बघायला मिळते.
तसेच वज्रपाणी, अवलोकितेश्र्वर, तारादेवी
यांच्याही मूर्ती पाहायला मिळतात.
·
बाराव्या क्रमांकाचे लेणे
‘तीनताला’ या नावाने प्रसिद्ध असून
ते चैत्यगृह आणि विहार अशा दुहेरी स्वरूपाचे आहे. ३५ x१२.५ चौ. मी.
क्षेत्रफळ असणार्या या लेणीत गर्भगृह, अंतराळ, सभामंडप
समाविष्ट आहे. या लेणीनंतर हिंदुधर्मीय लेणी सुरू होतात.
·
हिंदुधर्मीय लेणींमधील १४
व्या क्रमांकाचे लेणे ‘रावण की खाई’ या नावाने
प्रसिद्ध आहे. कैलास पर्वत उचलत असलेल्या रावणाच्या शिल्पामुळे हे लेणे जगप्रसिद्ध
झाले आहे. याच लेण्यामध्ये कमलासनावर बसलेल्या विष्णुपत्नी लक्ष्मीचे शिल्प
कोरलेले आहे. त्यात लक्ष्मीला आपल्या सोंडेने स्नान घालणारे हत्ती, तसेच कासव,
मासे, कमळाची फुले, चतुर्भुज सेवक हेदेखील
उत्तमरीत्या रेखाटलेले आहेत. त्यामुळे हे शिल्प आपल्याला सजीव असल्याचा भास होतो.
१५ व्या क्रमांकाचे ‘दशावतार’ हे लेणेदेखील
तसेच प्रसिद्ध आहे. यातील सर्व शिल्पकला भगवान विष्णुंनी घेतलेल्या दहा
अवतारांच्या कथांना समोर ठेवून साकार केली आहे. या लेणींमधील भगवान नृसिंहाने
केलेला हिरण्यकश्यपूचा वध हे शिल्प पाहण्यासारखे आहे. या शिल्पामध्ये भगवान नृसिंह
जेवढे उग्र दाखवले आहेत, तेवढाच भयभीत झालेला
हिरण्यकश्यपूदेखील दाखवलेला आहे.
·
१६ व्या क्रमांकाचे लेणे
हे ‘कैलास लेणे’ या नावाने जगप्रसिद्ध आहे.
कारण याच कैलास मंदिरामुळे ‘आधी कळस, मग पाया’
ही नवी म्हण निर्माण झाली आहे असे म्हणता येईल. कारण, कोणतीही
वास्तू उभी करतांना त्या वास्तूचा पाया आधी तयार होतो व मग त्यावर सर्वांत शेवटी
कळस चढवला जातो. पण हे कैलास मंदिर मात्र त्या तत्त्वाला अपवाद ठरले आहे. हे
संपूर्ण मंदिर एकाच-एकसंघ अशा-दगडात कोरलेले आहे. या मंदिराभोवती दगडांची नैसर्गिक
भिंत आहे. त्यावर विविध प्रकारची अर्धस्तंभांनी विभागलेली देवकोष्टे आहेत. ६०x३० चौ. मी.
च्या पहाडातून अगदी मध्यभागी या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे. मंदिराची
शिल्पशैली द्रविड पद्धतीची आहे. मंदिराच्या भोवती पाच लहान लहान मंदिरे असून समोर
नंदीमंडप आहे. हे मंदिर एका उंच अशा जोत्यावर उभे असून त्या जोत्यावरच हत्ती,
सिंह हे प्राणी कोरलेले आहेत. दूरून या मंदिराकडे पाहिले तर हे हत्ती, सिंह या
मंदिराला आपल्या पाठीवर उचलून धरत आहेत असे वाटते. कैलास पर्वत उचलणार्या रावणाची
बरीच शिल्पे या वेरूळच्या लेण्यांमध्ये आढळतात. पण या सर्वात कैलास मंदिरातील
शिल्प उत्कृष्ट आहे. याशिवाय गंगा, यमुना, सारीपाट
खेळणारे शिव-पार्वती, कार्तिकस्वामी, गणेश,
नटराज यांचीही शिल्पे येथे पाहण्यास मिळतात. या हिंदू लेणींमध्ये शैव-वैष्णव
असा भेदभाव फारसा दिसत नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा