Powered By Blogger

गुरुवार, ५ जानेवारी, २०१२

मराठी कथा


मराठी कथा :



कथाहा मराठी साहित्यपरंपरेचा एक प्रमुख व मौलिक घटक आहे. कालप्रवाहात तिचा विकास-विस्तार होत गेला. मराठी कथेची मुळे महाराष्ट्रातील मातीत रुजलेली आहेत. इथल्या जीवनव्यवहाराची व्याप्ती आणि परंपरा तिने जोपासली आहे. जातककथा, लोककथा, रामायण-महाभारतावर आधारित कथा, पौराणिक कहाण्या, व्रतकथा, महानुभाव संप्रदायाच्या ग्रंथांतील कथा, सांप्रदायिक कथा, एकोणिसाव्या शतकात विविध भाषांतून मराठीत भाषांतरित झालेल्या कथा, स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा, स्वातंत्र्योत्तर काळातील वास्तववादी कथा, ग्रामीण कथा, दलित कथा, आदिवासी कथा असे तिचे विश्र्व विराट आहे.



स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी कथापरंपरा :



अव्वल इंग्रजी कालखंडात मराठी कथात्म लेखनाचे जे प्रयत्न झाले, ते बहुतांशी भाषांतरित अथवा रूपांतरित स्वरूपाचे होते. अर्वाचीन मराठी कथारचनेचा प्रारंभ तंजावर येथे सर्फोजी राजांनी केला. त्यांनी इ.स. १८०६ मध्ये बालबोध-मुक्तावलिहे इसापाच्या कथांचे भाषांतर करवून घेतले. वैजनाथ पंडितांनी सिंहासन बत्तिशी’ (१८१४), ‘पंचतंत्र’(१८१५), ‘हितोपदेश’ (१८१५), राजा प्रतापादित्याचे चरित्र’ (१८१६) हे ग्रंथ लिहिले. हे सर्व ग्रंथ कमी अधिक प्रमाणात भाषांतरित आहेत. नीतिकथा, बोधकथा, दंतकथा, ऐतिहासिक कथा, शृंगारिक कथा अशा अनेक कथाप्रकारांची सरमिसळ या ग्रंथांमध्ये झालेली दिसते. डॉ. रामजी गणोजीकृत स्त्रीचरित्र’ (१८५४) या कथासंग्रहात मुख्यत्वेकरून शृंगारिक कथा आहेत. या संकलनात शुकबहातरीपासून अरबी कथेपर्यंतच्या विविध गोष्टी भाषांतरित वा रूपांतरित स्वरूपात आहेत. नारायणबोध’ (१८६०), कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्या अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी’ (१८६१-१८६५), चिंतामण दीक्षित-जोशी यांनी केलेले विदग्ध स्त्री चरित्र’ (१८७१) हे शृंगारकथांचे संकलन, गोविंद शंकर बापटकृत इलिझाबेथअथवा सिबिरिया देशातील हद्दपार कुटुंब’ (१८७४), ‘पाल आणि व्हर्जिनिया’ (१८७५), ‘हरि आणि त्रिंबक’ (१८७५), रावजी वासुदेव साठेकृत रसिकप्रिया अथवा डिकॅमेरॉन’ (१८७९) हा अनुवाद - हे ग्रंथ सुरुवातीच्या काळात निर्माण झाले.



अद्‌भूतरम्यता आणि शृंगारिकता यांचे प्राबल्य असलेल्या अव्वल इंग्रजी कालखंडातील कथात्म वाड्मयाला जीवनस्पर्शी बनवले ते हरिभाऊ आपटे यांनी.  तो काळ सामाजिक प्रबोधनाचा होता. विधवाविवाह, बालविवाह, जरठबालाविवाह, केशवपनाची चाल असे अनेक-तत्कालीन समाजाला ग्रासणारे प्रश्र्न त्यांच्या कथांतून या ना त्या स्वरूपात दिसतात. हरिभाऊंनी तत्कालीन युगधर्माशी आपल्या साहित्याची सांगड घातली. राष्ट्रीयत्व व स्वातंत्र्याकांक्षा आणि सामाजिक सुधारणावाद ह्या या युगधर्माच्या दोन अंगांची टिळक व आगरकर ही दोन प्रतीके! हरिभाऊंनी आपल्या साहित्याच्या प्रपंचात ही दोन्ही अंगे विकसित केली. त्यांच्या कथालेखनाची सुरुवात खर्‍या अर्थाने कानिटकर आणि मंडळीयांच्या मनोरंजनमासिकातून झाली. पुढे त्यांच्या स्वत:च्या करमणूकसाप्ताहिकातून त्यांचे बरेचसे कथालेखन झाले. करमणूकसाप्ताहिकातून प्रसिद्ध होणारी त्यांची स्फूट गोष्टही आधुनिक वळणाची कथा आहे, म्हणूनच हरिभाऊ आपटे हे आधुनिक मराठी कथेचे जनक होत. इ.स. १८८५ ते १९१० हा लघुकथेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण असा पहिला टप्पा मानला जातो. त्यावर नि:संशयपणे हरिभाऊ आपटे यांची नाममुद्रा आहे.



 इ.स. १९१० ते १९२५ या काळात मराठीतील नामवंत लेखकांनी - शि. म. परांजपे, न. चिं. केळकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि वा. म. जोशी यांनीही-कथालेखन केले. कथाया साहित्यप्रकाराची मोहिनी मासिक मनोरंजनमुळे वाढली. आपल्या कारकीर्दीत मनोरंजनने स्त्री - लेखिकांना उत्तेजन दिले. काशीताई कानिटकर, गिरिजाबाई केळकर, आनंदीबाई शिर्के यांचे कथालेखन मनोरंजनमध्ये सुरू झाले व बहरले. वि.सी. गुर्जर, दिवाकर कृष्ण हे कथाकार मनोरंजनमधूनच नावारूपास आले. त्या काळात गुर्जरांच्या कथांना खूप लोकप्रियता मिळाली.



हरिभाऊ आपटे यांच्या स्फूटगोष्टीला गुर्जरांनी संपूर्ण गोष्टबनवले. तर दिवाकर कृष्णांनी तिला कथारूप बहाल केले. अंगणातला पोपटया त्यांच्या पहिल्या कथेनेच रसिक वाचकांना आकर्षित केले. अल्प कथालेखन करूनही दिवाकर कृष्णांनी मराठी कथेला नवे वळण दिले. निवेदनामधील वैविध्य, भाषेचा प्रत्ययकारी वापर, तरल अनुभवही व्यक्त करण्याची शैली ही त्यांची वैशिष्ट्ये नोंदवता येतात.



ना.सी. फडके आणि वि. स. खांडेकर यांनी १९४५ पर्यंत मराठी वाचकांवर एकप्रकारे अधिराज्य गाजवले. फडके सुखवादी तर खांडेकर आदर्शवादी! त्यांचे ध्येयवादी नायक, त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणार्‍या रूपसुंदर नायिका, त्यांची भाषा यांची विलक्षण मोहिनी तत्कालीन मराठी वाचकांवर होती.



इ. स. १९२० ते १९४० या कालखंडात महाराष्ट्रातील समाजजीवन व कौटुंबिक जीवन यांत झपाट्याने बदल होत होते. मार्क्सवादी विचारांच्या परिचयाने बरीच मानवी दु:खे मानवनिर्मितच असतात याचे भान येऊ लागले होते. भारतातील स्वातंत्र्य चळवळीमुळे जीवनाकडे बघण्याचे नवे परिमाण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला लाभले. स्थिर शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचे रूपांतर झपाट्याने उद्योगव्यवसायावर आधारित गतिशील अशा व्यवस्थेत होऊ लागले. एकत्र कुटुंबांची जागा हळूहळू विभक्त कुटुंबे होऊ लागली. सुशिक्षित, पदवीधर स्त्रियांची संया वाढू लागली. प्रौढविवाह रूढ झाले. स्त्रीच्या जीवनात नव्याने निर्माण होऊ लागलेले ताण या काळात विभावरी शिरूरकर, कृष्णाबाई, कमलाबाई टिळक इत्यादी लेखिकांनी शब्दबद्ध केले. लघुकथेच्या फडकेप्रणीत साच्याकडे दुर्लक्ष करून कथेला तंत्रमुक्त केले ते कुसुमावती देशपांडे यांनी!



 लक्ष्मणराव सरदेसाई, ग.ल.ठोकळ, र.वा. दिघे ह्यांच्या कथावर फडके यांच्या रंजनवादी लेखनतंत्राचा खूप प्रभाव दिसतो. तर य.गो. जोशी, महादेवशास्त्री जोशी आणि चिं.वि. जोशी यांच्या या काळातील कथांतून फडके-खांडेकर यांच्या प्रभावातून सुटण्याचा प्रयत्न दिसतो. फडके यांच्या रेखीव रचना- तंत्राची थट्टा करणारी ग्यानबा तुकाराम आणि टेक्निकही कथा य. गो. जोशी यांनी लिहिली. रसरशीत अभिव्यक्ती असणारे महादेवशास्त्री जोशी आणि मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांची सुखदु:खे, जय-पराजय सहजतेने विनोदी कथांमधून आविष्कृत करणारे चिं.वि.जोशी हे मराठीतील महत्त्वाचे कथाकार आहेत. चिं.वि.जोशी यांच्या वरसंशोधन’, ‘स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग’, ‘माझे दत्तक वडीलइत्यादी कथांमधील अकृत्रिम, सुसंस्कृत आणि सहज विनोदाला मराठीत तोड नाही.



बी. रघुनाथ यांच्या कथांनी मराठवाड्यातील माणसांच्या जीवनाचे दर्शन घडवले. त्याचप्रमाणे श्री.म. माटे यांनीही उपेक्षितांच्या अंतरंगातडोकावून पाहिले. कथारूपाच्या प्रस्थापित संकेतांचे दडपण झुगारून या दोन्ही लेखकांनी कथालेखन केले. वामन चोरघडे यांच्या कथांतून भाषेचे, निवेदनाचे प्रयोग सहज घडत गेले. माणसाचे मन संपन्न करणारी त्यांची कथा आहे.



स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी कथा :

 दुसर्‍या महायुद्धानंतरच्या या काळात साहित्यातून व्यक्त होणार्‍या आशयाचे स्वरूप मुळापासून बदलले. कथेचा प्रस्थापित असा रूपबंध या बदललेल्या आशयाला कवेत घ्यायला अपुरा पडू लागला. त्यामुळे नवा रचनाबंध घडवणे अपरिहार्य ठरले. कथेतील कथानक, पात्र इत्यादी घटक तेच राहिले, तरी या घटकांच्या संकल्पना मुक्त, लवचीक बनल्या. त्यामुळे मराठी कथेने जणू कात टाकली. गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर, शांताराम, सदानंद रेगे, दि. बा. मोकाशी यांच्या कथांतून कथेची नवी रूपे मूर्त होऊ लागली. अश्लीलता, दुर्बोधता, वैफल्यग्रस्तता, जंतुवाद, कुरूपता, बीभत्सता असे अनेक आरोप नवकथेवर - विशेषत: गाडगीळांच्या कथेवर व मर्ढेकरांच्या कवितेवर-झाले. त्यातून अनेक वाद-प्रतिवाद झडले, काव्य-शास्त्र चर्चा रंगल्या. त्यामधून जे विचारमंथन झाले त्यातून नव्या जाणिवा घडल्या, रुजल्या आणि यथावकाश त्या विस्तारल्या! आधुनिक नागर जीवनाचे यथार्थ दर्शन घडवणारी गाडगीळांची कथा, सश्रद्ध आणि आशावादी दृष्टीने आश्र्वासक वाटणारी अरविंद गोखले यांची कथा, अपारंपरिक आशयसूत्रे सूक्ष्म आणि तरलपणे मांडणारी पु. भा. भावे यांची कथा आणि माणदेशी मातीचा रूपगंध घेऊन आलेली व्यंकटेश माडगूळकरांची कथा यामधून नवकथाहे नामाभिधान मिरवणारी कथा संपन्न झाली. व्यापक नैतिक प्रश्र्नांना भिडणारी शांताराम (के.ज. पुरोहित) यांची कथा, सौम्य आणि संयतपणे सामान्यांच्या जीवनाचा वेध घेणारी दि. बा. मोकाशी यांची कथा, तिरकस शैलीतून फँटसीच्या अंगाने अनुभव शब्दांकित करणारी सदानंद रेगे यांची कथा यांमुळे मराठी कथा समृद्ध बनली.



 इ. स. १९६० च्या आसपास नवकथेतून निर्माण झालेली नवी कथादृष्टी स्थिरावली. पण त्याचबरोबर एक प्रकारचे साचलेपण, कथेत निर्माण होऊ लागले. जुने संकेत नाकारत असताना कथा नव्या संकेतांच्या बंधनात अडकते की काय - असे वाटू लागले. जी. ए कुलकर्णी, कमल देसाई, विजया राजाध्यक्ष, विद्याधर पुंडलिक, शरच्चंद्र चिरमुले, श्री. दा. पानवलकर, शंकर पाटील, ए. वि. जोशी, तारा वनारसे, सरिता पदकी, ज्ञानेश्र्वर नाडकर्णी, वि. शं. पारगावकर अशी कथाकारांची नवी पिढी या काळात जोमाने लेखन करू लागली. यांतील प्रत्येक कथाकाराचे लेखन त्याच्या त्याच्या कलानिर्मितीच्या प्रेरणांशी सुसंगत आहे.





 जी. ए. कुलकर्णी यांनी आपल्या निळासावळा ते रक्तचंदन’ (१९६६) या संग्रहांतल्या कथांतून मानवी जीवनाचे शोकात्म भान व्यक्त केले. मानवी नेणिवेतील खोलवरच्या मनोव्यापारांचे चित्रण त्यांच्या अनुभवविश्र्वाला व्यामिश्र बनवते. आपल्या कथानिर्मितीने जी. एं. नी मराठी कथा साहित्यातील एक मानदंडअशी मान्यता मिळवली.



 माणसाच्या मूलभूत एकटेपणातील उदास भाव - हे पुंडलिकांच्या कथांचे महत्त्वाचे आशयसूत्र आहे. सनातन श्रद्धेच्या रहस्याचा शोध घेणार्‍या त्यांच्या कथांतील अनुभवांना अनेकदा गूढतेचा स्पर्श झालेला दिसतो. (उदा. दवणा, जन्म इ.)



श्री. दा. पानवलकर यांची कथा कथानक, पात्रचित्रण, वातावरण, निवेदन आणि भाषा - या सर्वच अंगांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण दाखवते. पोलीस खाते, कस्टम्स, संस्थानी परिसर यांतील अनुभवांचे रंगेल आणि रांगडे पुरुषी जग त्यांनी चित्रित केले. आनंद विनायक जातेगावकर (मुखवटे-१९७४) यांनी मध्यमवर्गीय माणसाची साचेबंदपणाची, अजस्त्र कंटाळ्याची जाणीव शब्दबद्ध केली, तर शरच्चंद्र चिरमुले (श्रीशिल्लक-१९६७) यांनी असाधारण घटना व पात्रे यांच्या निर्मितीमधून जीवनाचे अर्थपूर्ण पण वैचित्र्यपूर्ण रूप दाखवले. ए. वि. जोशी (कृष्णाकाठचे देव, १९६१) यांनी मोजके परंतु दमदार कथालेखन केले. ज्ञानेश्र्वर नाडकर्णी हे या कालखंडातील एक प्रतिभाशाली लेखक (चिद्घोष-१९६६). आपल्या कथांतून त्यांनी काहीशा जगावेगळ्या, वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या माणसांचे जीवनरंग दाखवले. प्रतिमासृष्टीतील मौलिकता आणि अनोखेपण यासाठीही त्यांचा विशेष उल्लेख करावा लागतो.

नाटककार म्हणून ख्यात असलेल्या विजय तेंडुलकर (काचपात्रे-१९५८), जयवंत दळवी (गहिवर-१९५६) यांनी कथांमधून जीवनातील विरूपाचे, विसंगतीचे भेदक दर्शन घडवले. शशिकांत पुनर्वसू उर्फ मो. शं. भडभडे, ‘माणूसया टोपणनावाने लिहिणारे अंबादास अग्निहोत्री, ‘सिनिकउर्फ दा. गो. देशपांडे, वसंत नरहर फेणे यांनीही मराठी कथाविश्र्वात वैशिष्ट्यपूर्ण भर घातली. मध्यमवर्गीय भावजीवनाचे सहानुभवाने, वैविध्यपूर्ण चित्रण करणारे शं. ना. नवरे, अच्युत बर्वे, मंगेश पदकी यांचाही उल्लेख करायला हवा. सर्वसामान्य मराठी माणसाशी संवाद साधण्यात यशस्वी झालेले व.पु. काळे यांचे लेखनही याच काळातले. कथाकथनाचे माध्यम हाताळण्याचे त्यांचे कौशल्य हा संवाद हृद्य करण्यासाठी उपयुक्त ठरले. नीटस रचना आणि चतुर संवाद यांमुळे त्यांची कथा आकर्षून घेते. नागर जीवनातील बदलत्या संवेदनांचा वेध घेणारी कथा ह. मो. मराठे यांनी लिहिली. सत्तरच्या दशकातील ते एक महत्त्वाचे कथाकार आहेत.



 माणसाच्या एकाकीपणाचा अनेक बाजूंनी शोध घेणारे अनिल रघुनाथ कुलकर्णी, ग्रामीण कथेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे शंकर पाटील, द.मा.मिरासदार, उद्धव शेळके, रा. रे. बोराडे, आनंद यादव, सखा कलाल, कोकण परिसराचे दर्शन घडवणारे बाळकृष्ण प्रभुदेसाई, मधु मंगेश कर्णिक, प्र. ल. मयेकर हेही महत्त्वाचे कथाकार आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या ग्रामीण साहित्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांतून मराठी समाजातील अशा समूहांचे, त्यांच्या सामाजिक व व्यक्तिगत सुखदु:खाचे, जीवनसरणीचे चित्रण घडले, जे आजवर मराठी साहित्यात घडले नव्हते किंवा झाले असल्यास त्या संवेदनशीलतेने झाले नव्हते. चारुता सागर, द. ता. भोसले, मनोहर तल्हार यांनी डोंबारी, गारुडी, नंदीबैल फिरवणारे, जोगतिणी अशा विविध माणसांचे चित्रण जाणकारीने केले. बदलत्या ग्रामीण वास्तवाचा वेध त्यानंरच्या पिढीतील भास्कर चंदनशिव, आनंद पाटील, प्रतिमा इंगोले, उत्तम बावस्कर, सदानंद देशमुख, नागनाथ कोतापल्ले, राजन गवस इत्यादी लेखक घेताना दिसतात.



 ग्रामीण कथेप्रमाणेच दलित कथेनेही समाजातील तळागाळातील समूहांचे संवेदनशीलतेने दर्शन घडवले. महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा मिळालेल्या दलित लेखकांची जडणघडण झाली ती मुख्यत: सत्यशोधक व आंबेडकरी चळवळीतून,  तत्त्वज्ञानातून. या परिवर्तनवादी चळवळीतून दलित साहित्याला प्रेरणा मिळाली व ते साहित्य आंदोलनाचे माध्यम बनले. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेचे अधिष्ठान असलेले, मानवतावादी मूल्यविचार स्वीकारणारे, संस्कृतीच्या लोकशाहीकरणाचे उद्दिष्ट असलेले हे साहित्य आहे. त्याच्या मुळाशी विद्रोहाची जाणीव आहे आणि त्याची भाषा संघर्षाची आहे. ऐतिहासिकदृष्ट्या दलित कथालेखन १९३० नंतरच्या दशकात सुरू झाले असले, तरी १९६० नंतरचा कालखंड दलित कथालेखनात प्रभावशाली ठरतो. अस्मितादर्शया नियतकालिकाचा उदय याच कालखंडातला! बंधुमाधव मोडक (आम्हीही माणसं आहोत- १९८१) हे या काळातले पहिले उल्लेखनीय दलित कथाकार. क्रांतीचा उद्घोष करणारा नायक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी रंगवला (खुळंवाडी-१९५७) शंकरराव खरात यांनी ग्रामव्यवस्थेतील बलुतेदारीने दलितांचे गोठवलेले जीवन आणि या शोषणात केला जाणारा प्रतिकार यांचे चित्रण केले. बाबूराव बागूल यांच्या कथेपासून दलित साहित्याचे एक नवे पर्व सुरू होते. दलित आत्मभानाची प्रचीती देणारी कथा बागूलांनी लिहिली (जेव्हा मी जात चोरली होती - १९६३). खेड्यातील दलिताबरोबरच झोपडपट्टीत राहणार्‍या, रस्त्यांवर राहणार्‍या माणसांच्या जीवनाचे कठोर वास्तव त्यांनी रंगवले. वामन होवाळ, केशव मेश्राम, योगिराज वाघमारे, अर्जुन डांगळे, योगेंद्र मेश्राम, सुखराम हिवराळे, अविनाश डोळस, भीमराव शिवराळे, उर्मिला पवार, भास्कर चंदनशिव या  लेखकांनी दखल घ्यावी असे कथालेखन करून मराठी कथापरंपरेला नवी परिमाणे बहाल केली.



स्त्रियांचे कथालेखन :

 साठनंतरच्या कालखंडातला कथासाहित्याचा एक जोमदार प्रवाह हा स्त्रियांच्या कथासाहित्याचा आहे. नवे आत्मभान, आत्मसन्मान यांची प्रचीती आलेल्या, ‘स्त्रीत्वाचा नव्याने शोध घेणार्‍या, मुक्तीचे मोल जाणलेल्या आधुनिक स्त्रीच्या संवेदनशीलतेचे चित्रण, स्त्रीच्या दृष्टिकोणातून घडलेले जीवनदर्शन हा या कथांचा उल्लेखनीय विशेष आहे.



या कालखंडात स्त्रियांनी वैविध्यपूर्ण कथालेखन केले त्याचा धावता आढावा इथे घेतला आहे. १९६० च्या पूर्वीच कथालेखनाला सुरुवात केलेल्या वसुंधरा पटवर्धन, पुढील काळातील विजया राजाध्यक्ष यांचे कथालेखन महत्त्वाचे आहे. ज्योत्स्ना देवधर यांच्या कथांतून स्त्रीच्या वाट्याला येणारी दु:खे, वेदना, तिच्या जीवनातील कारुण्य यांचे चित्रण आहे. कथाकथनाच्या माध्यमातून मोठ्या समुदायापर्यंत कथा पोहचवणार्‍या लेखिका - ही ज्योत्स्नाबाईंची विशेष ओळख आहे. योगिनी जोगळेकर, सुमती क्षेत्रमाडे, स्नेहलता दसनूरकर, कुमुदिनी रांगणेकर, कुसुम अभ्यंकर, शैलजा राजे, शकुंतला गोगटे यांनी वाचकप्रिय लेखन केले.



 बदलत्या स्त्रीभानाचे, आधुनिक जाणिवांचे दर्शन विजया राजाध्यक्ष यांच्या कथेने घडवले. महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय स्त्री जीवनाचा एक आलेख विजयाबाईंच्या कथांतून रेखाटता येतो. तारा वनारसे यांची कथा सुजाण वृत्तीने जीवनाचा वेध घेते. मनोवास्तवाचे सूक्ष्म चित्रण करणारी त्यांची कथा संयत भाषाशैलीमुळे वैशिष्ट्यपूर्ण बनली आहे. गौरी देशपांडे हे कथा क्षेत्रातील आणखी एक ठळक नाव होय.



 वसुधा पाटील (जमुनाके तीर-१९६८), सरिता पदकी (बारा रामांचं देऊळ-१९६३), सुधा नरवणे (लामणदिवा-१९७०), छाया दातार (१९७३), दीपा गोवारीकर (१९७७), पद्मजा फाटक (१९७८), पद्मिनी बिनिवाले (१९७८), उर्मिला सिरुर (१९८०), सानिया (१९८०), अंबिका सरकार (१९८०), रोहिणी कुलकर्णी (१९८१), आशा बगे (१९८४), प्रतिमा इंगोले (१९८४),  प्रिया तेंडुलकर (१९८७), उर्मिला पवार (१९८८), सुकन्या आगाशे (१९८९), मेघना पेठे (१९९८), मोनिका गजेंद्रगडकर (२००५) ही लेखिकांची पिढी त्या- त्या काळात नव्या जाणिवेतून कथा-लेखन करत गेली.



 गंभीर वृत्तीने कलापूर्ण व स्वत्वसंपन्न अशी कथा आशा बगे लिहीत आहेत. स्त्रीवादी जाणिवांचा जोरदार धक्का देऊन, खडबडून जागे करून विचार करायला भाग पाडणारा उद्गार गौरी देशपांडे यांच्या कथात्म साहित्यातून उमटला. माणसांकडे, भोवतालच्या वास्तवाकडे पाहण्याच्या दृष्टिकोणातील ताजेपणा, ‘स्वतंत्रता हा गौरी देशपांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा धर्म त्यांच्या कथांतून स्पष्टपणे प्रतीत होतो. सानिया यांनी बुद्धिनिष्ठ, कर्तबगार, आत्मनिर्भर वृत्तीची स्त्री रंगवली. तर समकालीन वास्तवाचा थेट संदर्भ असलेली, बंडखोर वृत्तीची स्त्री प्रिया तेंडुलकर यांच्या लेखनात दिसते. आत्मप्रत्ययाने विशेष लक्ष वेधून घेणारी कथा मेघना पेठे लिहीत आहेत. स्त्रीवादी संवेदनांचा आणि महानगरी जाणिवांचा आविष्कार ती घडवत असली तरी त्या पलीकडे जाऊन ती माणसाच्या एकाकीपणाचा विविधांगी शोध घेते.



दिलीप चित्रे, भाऊ पाध्ये, विलास सारंग, श्याम मनोहर, अनिल डांगे, एस. डी. इनामदार, रंगनाथ पठारे, राजन खान, मिलिंद बोकील यांनी आधुनिक जीवन जाणिवांचा आविष्कार घडवत मराठी कथासाहित्यपरंपरा समृद्ध केली आहे. जीवनातील असंबद्धता, असंगतता, संदर्भहीनता यांचा प्रत्यय त्यांच्या कथेतून येतो. माणसाचे तुटलेपण, एकाकीपण, मानवी संबंधांमधील अटळ दुरावा यांचा अनुभव ती मूर्त करते. त्यामुळे अस्वस्थ करणारी, अंतर्मुख करणारी ही कथा आहे. चिंतनात्मकता हा तिचा स्वभावधर्म आहे.



गूढकथा, विज्ञानकथा, विनोदी कथा अशा कथाप्रवाहांनी मराठी कथा परंपरा विविधांगी बनली आहे. मराठी माणसाच्या मनाचे, संस्कृतीचे दर्शन तिच्यातून घडते. बदलत्या काळात साहित्य संस्कृतीचे स्वरूप बहुआयामी झाले. त्याचा प्रत्यय मराठी कथांतून येतो. सतत आवाहन करणारा आणि आव्हान देणारा असा हा साहित्यप्रकार असल्यामुळे नवनवीन कथाकार उदयाला येताना दिसतात.


२ टिप्पण्या:

  1. बाबाराव मुसळे यांच्या ग्रामीण कथा-बाबाराव मुसळे हे एकोणीसशे सतरच्या दशकातील ग्रामीण कथा आणि कादंबरी क्षेत्रातीलएक महत्वाचं नाव. त्यांचे'मोहरलेला चंद्र ', झिंगू लुखू लुखू 'आणि 'नगरभोजन 'हे तीन ग्रामीण कथा संग्रह प्रकाशित झाले आहेत. शिवाय आता पर्यंत अनेक दिवाळी अंक, नियतकालिके, अनियतकालिके यातून त्यांच्या ग्रामीण कथा प्रकाशित झाल्या आहेत. वेगवेगळ्या विद्यापीठात त्यांच्या कथा अभ्यासाला आहेत. त्यांच्या साहित्यावर अनेकांनी पीएच.डी, एमफिल केली आहे. संपर्क 9325044210 babaraomusale@gmail. com

    उत्तर द्याहटवा
  2. अभ्यासपूर्ण व संदर्भासाठी उपयुक्त लेख. उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा